औद्योगिक वसाहतीतील सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करून घ्यावी - जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ
अँटीजन टेस्ट करून घ्यावी - जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ
पालघर - ( मनीष गुप्ता ) पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून पालघर नगर परिषद व बोईसर - तारापूर एमआयडीसी या क्षेत्रामध्ये covid-19 चा प्रसार जास्त होत आहे तरी सर्व औद्योगिक वसाहतींमधील कर्मचाऱ्यांची रॅपिड एंटीजन टेस्ट २५ सप्टेंबर पर्यंत कुठल्याही परिस्थितीत करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिल्या.
औद्योगिक क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी तारापूर एमआयडीसी व पालघर मधील औद्योगिक वसाहतींच्या व्यवस्थापकांची आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीत विराज प्रोफाइल, आरती ड्रग्स, लुपिन फार्मा, निऑन लॅबरोटरीज टाटा स्टील व इतर अद्योगिक वसाहती सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक कर्मचाऱ्याची रॅपिड एंटीजन टेस्ट केल्यास ज्या कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणे नाहीत परंतु ते पॉझिटिव आहेत असे रुग्ण समोर येऊन कारखान्यांमधील व कारखान्यात बाहेरील कोरोनाचा संसर्ग थांबण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे दर दहा दिवसांनी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. तसेच सर्व औद्योगिक वसाहतीं कडे स्वतःची स्वतंत्र अशी सुविधा असणे आवश्यक असून शंभर कर्मचाऱ्यां मागे दोन टक्के बेड असलेले डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) निर्माण करावे अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या. उपस्थित असलेल्या प्रतिनिधींकडून आपापल्या कर्मचाऱ्यांची संख्या कोव्हीड साठी केलेल्या सुविधा कर्मचाऱ्यांची केलेली चाचणी याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडूनN सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे, तहसिलदार चंद्रसेन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सुर्यवंशी व इतर अधिकारी उपस्थित होते.