गोवा विधानसभेसाठी निवडणुकांचा नुकताच निकाल लागला. या निकालामुळे अनेक राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञ अचंबित झाले असले तरी भाजपाच्या संघटनेला पक्षाच्या विजयाची पूर्ण खात्री होती. सलग दहा वर्षे सत्ता असल्याने यावेळी राज्यात बदल होईल, अशी अटकळ अनेकांनी व्यक्त केली होती. तसेच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, दिल्लीतील आम् आदमी पक्ष जोरदार ताकदीने उतरल्याने भाजपाला जोरदार दणका बसणार, असे चित्र संपूर्ण राज्यात उभे केले गेले. पण गोमंतकीय जनतेने भाजपाच्या विकासाला आणि स्थैर्याला साथ दिली. अर्थातच, भाजपाच्या यशाचे श्रेय पक्षाच्या संघटनेला जाते.
गोवा भाजपाचे संघटनमंत्री सतिश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या दीड एक वर्षांपासून रात्रंदिवस मेहनत घेतली. स्थानिक संघटनेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांचे आणि नेतृत्वाचे सहकार्य लाभले. याला पुरक साथ मिळाली ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. पक्षाने श्री. फडणवीस यांची निवडणूक प्रभारी म्हणून केलेली निवड सार्थ ठरली. श्री. फडणवीस अभ्यासू, धडाडीचे नेते आहेतच. याशिवाय ते उत्तम वक्ते आहेत. मुत्सद्दीपणा हा त्यांचा वाखाणण्यासारखा गुण. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व तसेच कोकणीचे ज्ञान ही त्यांची आणखी एक जमेची बाजू. त्यांच्या जोडीला असलेले गोवा भाजपचे प्रभारी सी टी रवी, उप प्रभारी जय किशन रेड्डी, निवडणूक उप प्रभारी दर्शना जर्दोश यांची सुरेख साथ मिळाली.
आधुनिक गोव्याचे शिल्पकार स्व. मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच सार्वजनिक निवडणूक होती. अर्थातच यामुळे पक्ष नेतृत्वापुढे मोठे आव्हान होते. त्यातच कोरोना महामारीमुळे राज्याच्या अर्थ व्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. यामुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासमोरही मोठे आव्हान होते. मात्र या सर्वांवर मात करत पक्ष संघटनेने राज्य सरकारचे आणि पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे अमूल्य काम केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गोव्याला सर्वोतोपरी सहकार्य केले. तसेच बहुतांश निर्णयाचे अधिकारही दिले. यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांना तातडीने आणि धडाडीने कामे करणे सहजसोपे झाले.
राज्यातील जिल्हा पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुका कोरोना काळात झाल्या. त्यावेळी राज्यात सरकारविरुद्ध वातावरण झाले होते. रेल्वे मार्ग दुपदरीकरण, आय आय टी प्रकल्प, कोळसा वाहतूक अशा प्रश्नांवरून विरोधकांनी रान उठवले होते. तरीही या दोन्ही निवडणुकांत भाजपाला उल्लेखनीय यश मिळाले. तेंव्हापासून सरकार आणि पक्षासमोरील आव्हाने लक्षात घेऊन पक्ष संघटन कामास लागले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेट - तानावडे यांनी पक्ष पातळीवर आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकार पातळीवर कंबर कसली. आवश्यक त्या ठिकाणी पक्षाची पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी सुसंवाद, मतदारसंघात बैठका, मार्गदर्शन मेळावे आदींच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले. तर मुख्यमंत्र्यांनी ''सरकार आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत गावोगावी भेटी दिल्या. लोकांचे प्रश्न, समस्या, अडचणी तातडीने सोडवण्यास प्राधान्य दिले. कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही सरकारी योजनांची नियमित अंमलबजावणी करण्यात आले. पक्षाचे जिल्हा, पंचायत पातळीवरील बहुतांश पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते जीव झोकून कामास लागले. अर्थातच या सर्वांमागे मोठे योगदान होते ते पक्षाचे संघटन मंत्री श्री. धोंड यांचे.
निवडणुका जाहीर होताच राज्यातील अन्य राजकीय पक्षांमध्ये संदोपसंदी सुरू असताना भाजपचे संघटन मात्र निवडणुकीच्या कामाला लागले. राष्ट्रीय नेत्यांपासून स्थानिक नेते, पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्ते नेटाने काम करू लागले. वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, पदाधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद, कार्यकर्त्यांशी सततचा संपर्क अशा अनेक बाबींचा परिणाम राज्यात पुन्हा सत्ता येण्यात झाला.
***
मुख्यमंत्री, धोंड आणि तानावडे यांची दमदार कामगिरी
निवडणुका जाहीर होताच काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले आमदार आणि पक्षाचे मूळ कार्यकर्ते यांच्यामध्ये काही ठिकाणी दुरावा निर्माण झाला होता. तसेच काही महत्त्वाकांक्षी नेत्यांमुळे पक्षात चलबिचल झाली. तसेच फॅमिली राज फॅक्टर मुळे स्थानिक नेते कचाट्यात सापडले होते. मात्र राष्ट्रीय नेत्यांचे मार्गदर्शन आणि निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटनमंत्री सतिश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर यशस्वीपणे मात केली. अनेकांची समजूत काढली. एक - दोन नेते वगळता सर्वांची नाराजी दूर करण्यात ते यशस्वी झाले. धाडसी आणि जोखमीचे निर्णय घेऊन ते योग्य असल्याचे सिद्ध केले.