राज्यात फोन टँपिंग प्रकरण चांगलेच गाजले असताना, या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज नागपूर शहरात पत्रपरिषदेत केली.
या प्रकरणात जे जे लोक सहभागी आहेत, त्यांच्या विरुद्ध कडक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे . राजकीय नेते बच्चू कडू, नाना पटोले, आशिष देशमुख यांची टोपण नावे दाखवून फोन टँपिंग करण्यात आले, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्याच्या प्रमुखाची परवानगी घेतल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन केले नसल्याचा आरोपही अतुल लोंढे यांनी केला. रश्मी शुक्ल यांची चौकशी नाही तर या प्रकरणात जे जे लोक सहभागी झाले , त्यांची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना २०१७ व २०१८ मध्ये अनेक मंत्र्यांचे व नेत्यांचे व आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आले होते, या विरुद्ध गेल्या अधिवेशनात नाना पटोले यांनी सभागृहात आवाज उठवला होता, त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे. तत्कालीन DGP संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती, या समितीने अहवाल दिला आहे, त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शुक्लांना तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. हे प्रकरण इतके मोठे आहे, कुणीही अधिकारी स्वतःहून करणार नाही , यामागे मोठ्या राजकीय शक्तीचा हात आहे त्यामुळे रश्मी शुक्लांना फोन टॅप करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असावे त्याचीही चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.