पणजी, दि. १२ :
काँग्रेसने प्रचाराची खालची पातळी गाठली आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्याविषयी हीन दर्जाचे वक्तव्य करून काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी काँगेसचे रूप दाखवले आहे. याबद्दल मी राज्याचा प्रमुख या नात्याने समस्त गोमंतकीय जनतेच्यावतीने दिगंबर कामत आणि फ्रान्सिस डिसोझा यांचा कडक शब्दात निषेध करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
येथील निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकल्येकर उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांत भाजपाने राज्याचा केलेला विकास आणि कामे याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसला टीका करायची तर त्यांनी आमच्यावर करावी. पक्षावर करावी. पण दिवंगत झालेल्या पर्रीकर यांच्या सारख्या नेत्यावर भाष्य करणे निषेधार्ह आहे. राज्याच्या विकासात स्व. पर्रीकर यांचे मोठे योगदान आहे. तसेच संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाला माहीत आहे. तरीही त्यांच्याविषयी अशा पद्धतीने सर्दिन यांच्यासारख्या नेत्याने शब्द वापरणे हीन दर्जाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने केलेल्या कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षांत राज्याचा सर्वांगीण विकास केला. पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षाने माझ्यावर राज्याची जबाबदारी टाकली. माझ्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांसह पूल, सरकारी शाळांची दुरुस्ती, सरकारी इस्पितळांचे आधुनिकीकरण करण्यात आले. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचवल्या. कोरोना महामारीच्या कठीण काळात कोणतीही सामाजिक योजना बंद पडू दिली नाही, असे ते म्हणाले.
भाजपाला किती जागा मिळतील, असे विचारले असता ते म्हणाले, आम्ही २२ प्लसचा संकल्प केला आहे. पण एकूणच राज्यातील लोकांचा रागरंग पाहाता आम्ही त्यापेक्षा अधिक जागा घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा साध्य करण्यासाठी गोमंतकीय जनतेने भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.