गोव्यात शिवसेना घरोघरी प्रचाराला पोहोचली. गोव्यात शिवसेनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे भुमिपुत्रांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही गोव्यात आलो असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात लोकांचा विकास झाला की ठरावीक पक्षांचा विकास झाला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षात एनडीएच्या सर्व मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला असल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला.
शिवसेना वाघ आहे आणि वाघांचा बाजार नसतो असे ठाकरे म्हणाले. आमचा उमेदवार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आहे, त्याठिकाणी इतर पक्षाचा कोण उमेदवार आहे हे महत्वाचे नाही. अनेकांकडून प्रचाराला येऊ नका म्हणून फोन आले, कोणत्या पक्षाकडून आले हे आता बोलायला नको असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
दिवंगत मनोहर पर्रिकर यांना न्याय देण्यासाठी उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचे गोव्यात 11 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मला विश्वास आहे की आमचे सर्व उमेदवार विधानभवनात जाणार आहेत. आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठिमागे गोव्यातील जनता उभी असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान, पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे ते म्हणाले. आमचा पक्ष मैत्री जपणारा पक्ष आहे. आमच्या वचननाम्यात शाश्वत विकासाचे मॉडेल आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही असेही ते म्हणाले...