पणजी, दि. ६ :
गानसम्राज्ञी तथा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अतीव दुःख झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.
लता दीदी म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मूळचे मंगेशी - गोव्याचे. लतादीदी यांचे गोव्याशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते होते.
संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान पुढील १०० पिढ्या विसरता येणार नाहीत.
१९४२ आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या लता दीदींनी सुरुवातीच्या काळात खूप खस्ता खाल्या. तरीही त्यांनी संघर्ष करत स्व. दीनानाथ यांच्या माघारी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली.
जगभरात लता मंगेशकर हे नाव आपल्या देशाची ओळख बनले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज त्यांच्या जाण्याने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. संगीत क्षेत्रात त्यांचे नाव अजरामर राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या जाण्याचे दुःख पेलण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना देवो.