पणजी*
जनतेच्या सूचना शिफारशी विचारात घेऊन तयार केलेल्या भाजपच्या संकल्पनामाचे म्हणजेच विधानसभा निवडणूक 2022 जाहीरनाम्याचे प्रकाशन केंद्रीय महामार्ग मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी ६ रोजी दुपारी१२.००वाजता करण्यात येणार आहे. पणजीतील एका तारांकीत हॉटेलात यासाठी एका सोहळ्याचे आयोजन भाजपने केले आहे.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी यावेळी उपस्थित राहतील.
भाजपने राज्यभरातील जनतेकडून या जाहीरनाम्यासाठी सूचना, शिफारशी ई-मेल, व्हाट्सअप, संकल्प पेटी या माध्यमातून मागवण्यात आल्या होत्या. संकल्प रथही राज्यभरात फिरवण्यात आले होते. त्या शिफारशी व सूचना यांचा समावेश असलेला जाहीरनामा भाजपने तयार केला आहे. त्याचे प्रकाशन आता करण्यात येणार आहे.
राज्यात अनेक कल्याणकारी योजना भाजप सरकारने राबवल्या आहेत. त्यामुळे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून कोणत्या नव्या योजना भाजपचे सरकार जनतेसमोर मांडणार आहे, याची उत्सुकता राज्यभरातील जनतेला आहे.
राज्याच्या दौऱ्यावर रविवारी असलेले केंद्रीय मंत्री गडकरी हे सांगे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांच्या प्रचारासाठी दुपारी ४.३० वाजता सांगे येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यानंतर केपे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या प्रचारासाठी ते सायंकाळी ५.४५ वाजता केपे येथे एका जाहीर सभेला संबोधित करतील. शिरोडा मतदारसंघातील उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारासाठी सायंकाळी सव्वा सात वाजता केंद्रीय मंत्री गडकरी जाहीर सभा घेणार आहेत.
मतदानाची तारीख जवळ येत असल्याने भाजपाने आपला प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीमुळे राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या घरोघरी संपर्क मोहिमेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. येत्या आठवड्याभरात पक्षाचे आणखी केंद्रीय नेते राज्यात दाखल होतील. तसेच पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच जाहीरनामा प्रसिद्ध होताच प्रचाराचा जोर आणखी वाढेल