भारताला दास्यत्वाच्या श्रृंखलांतून मुक्त करण्यासाठी झटणारे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस*

अनेक देशप्रेमी तरूणांच्या मनात जोश निर्माण झाला. दृढ संकल्प आणि आपल्या विचारात कधीही तडजोड न करणे अशी सुभाषचंद्र बोस यांनी ओळख होती. ते केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी प्रेरणास्थान आहेत.'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा' या घोषणेने प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्र प्रेमाची ज्योत फडकविली. इंग्रजांशी लढण्यासाठी बळ दिले परंतू भारतातील या महान नेत्याविषयी स्वतंत्र भारताच्या नागरिक म्हणून किती माहिती आहे हा प्रश्न आहे ? सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अनेक प्रसंग आहेत, २३ जानेवारीला असलेल्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याशी संबंधित काही  प्रसंग या लेखातून देण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.

Snehal Joshi .
  • Jan 22 2022 7:22PM

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक येथे  23.01.1897 या दिवशी बंगाली कुटुंबात झाला. ते इंग्लंडमध्ये आय्.सी.एस्. परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी आय्.सी.एस्. या पदवीचा त्याग केला, तसेच ‘जे इंग्रज आपल्याच देशवासियांचा छळ करतात, त्यांची नोकरी कधीच करायची नाही’, असे त्यांनी ठरवले. लहानपणी, सुभाषचंद्र बोस हे ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेतील शिक्षक वेणीमाधव दास यांनी सुभाषचंद्र यांच्यामधली सुप्त देशभक्ती जागृत केली. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाषचंद्र त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली. कोलकत्त्या मधील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषचंद्र यांनी महाविद्यालयात संप पुकारला होता. 

*स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य*
कोलकत्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाष बाबूंची दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती.यासाठी त्यांनी इंग्लंडहून दासबाबूंना पत्र लिहून, त्या माध्यमातून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
   1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. पुढे निवडणुकीत जिकल्यावर स्वतः दासबाबू कोलकत्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची कामे चांगल्या पद्धतीत केली. कोलकत्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळवून दिली. 

*भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ची स्थापना नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट*
बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आणि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच काळात सुभाषबाबू यांना 'नेताजी' ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.1937 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.

*फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना*
मे 3 मे 1939 रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नावाने आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.
  दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.

*आझाद हिंद सेनेची स्थापना*
 स्वराज्य स्थापनेच्या मुख्य उद्देशाने नेताजींनी आझाद हिंद चे हंगामी सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला.21 ऑक्टोबर 1943  रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले होते.
आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की राणी रेजिमेंटही बनवली गेली.
  पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील  भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला. आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

*बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी*
18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.23 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, 18 ऑगस्ट रोजी नेताजींचे विमानाला तैवानच्या भूमीवर अपघात झाला आणि त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.18 ऑगस्ट 1945 या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

*भारतरत्‍न पुरस्कार*
1992  साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद केला गेला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे. 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी माहिती जाणून घेऊन त्यातून प्रेरणा घेऊया आणि राष्ट्रप्रेम जगवूयात.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार