2017 पासून प्रलंबित असलेला चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होत आहे. व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम घोडसेची भूमिका केल्याचे समोर आले आहे. त्यावरून सध्या महाराष्ट्रात प्रचंड राजकारण तापलेले आहे. त्याचे पर्यवसान संघर्षात तर होणार नाही ना? अशी भीती जनसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ पूर्वीच झाले होते, त्यावेळी डॉ. कोल्हे राजकारणात नव्हते. खासदार असण्याचा तर प्रश्नच नव्हता, एक कलाकार या नात्याने त्यांनी ही आव्हानात्मक वाटणारी भूमिका स्वीकारली आणि आता तो चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या दरम्यान राजकारणात प्रवेश करून डॉ. कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार झाले आहेत. त्यामुळे या घटनेचे जबरदस्त राजकारण केले जाते आहे.
वस्तुतः एखाद्या कलाकाराने एखादी भूमिका केली, म्हणजे ती व्यक्तिरेखा त्याला मान्यच आहे, असे समजत येत नाही. त्या व्यक्तिरेखेपुरता तो कलाकार त्या भूमिकेत गुंतलेला असतो, या प्रकरणात डॉ. अमोल कोल्हे यांची बाजू मांडतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेला मुद्दा निश्चितच विचारात घेण्याजोगा आहे. पवार म्हणतात की छत्रपती शिवाजी चित्रपटात एखाद्या कलाकाराने औरंगजेबाची भूमिका स्वीकारली म्हणजे तो औरंगजेब झाला काय? तसेच एखाद्या प्रभू रामचंद्रवरील चित्रपटात एखाद्या कलाकाराने रावणाची भूमिका स्वीकारली म्हणजे तो रावणासारखा वाईट आहे असे समजायचे का? पवारांचा हा प्रश्न डॉ. कोल्हेंना विरोध करणाऱ्या सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे. असे असले तरी या मुद्द्यावर राजकारण सुरूच आहे.
नथुराम गोडसे याने गांधींची हत्या केली होती. त्यासाठी दोघांमध्ये असलेले वैचारिक मतभेद कारणीभूत ठरले होते. वैचारिक मतभेदाची एखाद्याचा जीव घ्यावा, ही भारतीय संस्कृती निश्चितच नाही, त्यातही नथुराम गोडसे ज्या हिंदू संस्कृतीचे समर्थक होते,त्यांचीही अशी विचारांच्या लढाईसाठी एखाद्याच्या जीव घेण्याची संस्कृती नाही. मात्र असे असले तरी गोडसेंनी हे कृत्य का केले, हे देखील समोर यायला हवे. या चित्रपटातील जर दुसरी बाजू समोर येणार असेल तर प्रेक्षक बघूनच काय बरोबर काय चूक ते ठरवतील.
मात्र गांधी विचारांचे पाईक असल्याचे कायम सांगत असलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस जणांनी अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली आहे. गांधींच्या खून्याचे उदात्तीकरण काँग्रेस कधीच सहन करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचीच धमकी दिली आहे. त्यामुळे प्रकरण जास्तच चिघळते आहे.
वस्तुतः भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, इथे वैचारिक मतभेदांचाही आदर केला जातो. विचारांचे उत्तर विचारांनीच दिले जाते, अश्यावेळी विचारांचे उत्तर हिंसेने देणे हे चुकीचे ठरेल. हा चित्रपट आला तरी मराठी प्रेक्षक सुजाण आहेत, हे प्रेक्षक चित्रपट जरूर बघतील मात्र त्यामुळे त्यांच्या मनातील गांधी जींच्या बाबत असलेल्या श्रद्धेला कुठेही धक्का पोहोचणार नाही. याची खात्री काँग्रेसजनांनी बाळगावी आणि विचारांचा विरोध विचारानेच करावा, इतकेच मराठी सामान्य जनतेला सुचवावेसे वाटते. व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाला काँग्रेसचा असलेला विरोध हा त्यामुळेच मराठी प्रेक्षकांना अनाठायी वाटतो.