स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले

मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचा त्रास सहन करून मुलींना शिक्षणाची व्यवस्था केली. विधवा स्त्रियांच्या आत्महत्या व भ्रूणहत्या थांबविण्यासाठी स्वतःच्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले व तेथील मुलांची आईप्रमाणे काळजी घेतली. एवढेच नव्हे, तर काशीबाई नावाच्या महिलेचा मुलगा दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केले. अशा आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला दिशा देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले.

Snehal Joshi .
  • Jan 2 2022 10:24PM
स्त्रीमुक्ती आंदोलनाची महाराष्ट्रातील पहिली अग्रणी म्हणून महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान आहे. एकोणिसाव्या शतकात स्त्रियांच्या उद्धारासाठी व्यतीत केलेले सावित्रीबाई फुलें सारखे अन्य आदर्श नी उदात्त उदाहरण क्वचितच आढळून  येईल. समाजातील स्त्रियांवरील अन्याया विरोधात लढा देऊन, स्वतःच्या जीवाची तमा न करता स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी व समाजात स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजविण्यासाठी सावित्रीबाईंनी मोलाचे योगदान दिले आहे. मांगल्य, धडाडी, निर्व्याज मानवता आणि भारतीय धवलता या गुणांनी त्यांनी मृतप्राय समाजात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले. तत्कालीन समाजाने मुलींना शिक्षणाचा अधिकार नाकारला असतांना मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ करून त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दालने खुली केली त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली. म्हणूनच त्या स्त्री-शिक्षणाच्या अग्रदूत ठरतात. त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन महिला मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. माता लक्ष्मीबाई आणि वडील खंडोजी नेवसे पाटील यांची सावित्रीबाई ही पहिली कन्या होय. इ.स १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. त्यानंतर या दाम्पत्याने समाज सुधारण्याच्या दृष्टीने आपल्या जीवनाला वाहून घेतले. इ.स. १८४८ साली पुण्यात बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतरही अनेक शाळा काढून शिक्षणाचा विस्तार केला. अनंत अडचणी, सामाजिक प्रतिकूलता, आर्थिक चणचण व अशा अनेक संकटांवर मात करून अवघ्या चार वर्षाच्या कालावधीत इतक्या शाळा एकोणिसाव्या शतकात काढून त्या नेटाने चालवण्याचे हे देशातील एकमेव उदाहरण होय. स्त्री शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक अत्यंत प्रभावी असे साधन आहे असे सांगणारे स्त्री शिक्षणाचे अग्रदूत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व स्त्रीमुक्तीचे कार्य समाजाला सामाजिक पारतंत्र्यातून मुक्त करून मानवतेचे मूल्य रुजविणारे आहे. सावित्रीबाईच्या कार्याची थोरवी पंडित सिताराम पाटील पुस्तकातून यथार्थ शब्दात वर्णन करतांना म्हणतात, "उभ्या आयुष्यात या महात्म्याला जगाने अनेक वेळा छळले व दूर लोटले पण जगातील एका जिवाने मात्र त्यांना प्रथमपासून तो त्यांच्या अखेरच्या घडीपर्यंत साथ दिली. त्यांना सोसाव्या लागलेल्या अपमानाचा व हाल-अपेष्टांचा काही भार आपल्या शिरावर घेऊन त्यांना वेळोवेळी सुखाचा, आनंदाचा, प्रीतीचा औदार्याचा हात दिला. जगातील त्यांचा हा एकुलता एक मित्र व त्यांना अखेर पर्यंत साथ देणारा जगातील एकुलता एक जीव कोण असावा बरे ? तो जीव, ती व्यक्ती व ती विभूती त्यांची श्रीमती होय. त्यांच्या जन्माची सोबतीण त्यांच्या सोबत होती. ती वीरपत्नी होती व ती सत्यवती होती. जोतीरावांचे सारे तेज, त्यांचे सारे धैर्य, त्यांचे सारे कर्तृत्व आणि त्यांचे सारे माहात्म्य या साध्वीच्या तपामुळेच खरेखुरे चमकले." अशा थोर सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून समाजातील अनिष्ट रूढीतून समाजाची मुक्तता करून स्त्रियांना बाल विवाह, विधवा पुनर्विवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा, केशवपन, महिला अत्याचार, विधवा आत्महत्या, भ्रूणहत्या यासारख्या अनेक जाचातून मुक्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचा त्रास सहन करून मुलींना शिक्षणाची व्यवस्था केली. विधवा स्त्रियांच्या आत्महत्या व भ्रूणहत्या थांबविण्यासाठी स्वतःच्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले व तेथील मुलांची आईप्रमाणे काळजी घेतली. एवढेच नव्हे, तर काशीबाई नावाच्या महिलेचा मुलगा दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केले. अशा आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाला दिशा देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले.  जोतीरावांच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली. सोबतच समाज जागृतीसाठी आपल्या लिखाणातून प्रबोधन केले. काव्यफुले, मातुश्री सावित्रीबाई भाषणे व गाणी, बावनकशी सुबोधरत्नाकर, जोतिबांची भाषणे इ. त्यांचे उपलब्ध साहित्य आहे. शिक्षणातून स्त्री बळकट झाली, तर स्त्रियांवरील होणारे अन्याय, अत्याचारातून त्यांचे संरक्षण होईल व त्या आपल्या परिवारापासून समाजाला घडवतील या विचारातून त्यांनी कार्य केले. त्यांचे हे कार्य समाजाला नवसंजीवनी देणारे आहे. सावित्रीबाईंनी समाजातील भेदभाव नष्ट करून प्रत्येक क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी आपले उभे आयुष्य वेचले आणि जीवनाच्या अंतापर्यंत समाजाची सेवा केली. अशातच प्लेगची साथ आली. त्यावेळी सावित्रीबाई गावोगावी प्लेगग्रस्त लोकांच्या मदतीसाठी जात. त्यांची शुश्रूषा करीत. अशा रुग्णांच्या त्या दायी झाल्या. म्हणूनच सावित्रीबाई ह्या खऱ्या अर्थाने 'मातृदेवता' होत. हरिजन वस्तीतील बाबाजी पांडूरंग गायकवाड या मुलांस खांद्यावरून नेत असतांना त्यांनाही प्लेगने ग्रासले. दि. १० मार्च, १८९७ रोजी या युगस्त्रीचे महानिर्वाण झाले. इ.स १८४८ पासून सुरु केलेल्या अखंड मानव सेवेच्या व्रताची सांगता इ.स. १८९७ ला समाप्त झाली. आपल्या जीवन ध्येयाला अनुरूप असे मरण फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येते. सावित्रीबाईं या भूमीतील पहिल्या समाजसेविका ठरल्या. सावित्रीबाईंच्या मृत्यूने एका तेजस्वी युगाचा अंत झाला. खरे पाहता त्या विचाराने, आचाराने 'महान' होत्या. 

 सावित्रीबाई फुले व जोतिराव फुले यांच्या कार्यामुळेच आज स्त्रियांना सर्व क्षेत्रात संधी मिळत आहे. परंतु समाजाची वाटचाल आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात होत असतांना काही ठिकाणी अजूनही जुन्या चालीरीती पाळल्या जातात. समाजाच्या सर्व क्षेत्रात अजूनही स्त्री-पुरुष समानता दिसून येत नाही. तसेच स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार थांबलेले नाही. आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह होतांना दिसतात. या बालविवाहांमुळे मुलींच्या शिक्षणात अडथळे, मुलींचे आरोग्य, जन्म घेणाऱ्या बालकांचे आरोग्य, कुपोषण बालविधवा, स्त्री-भ्रूणहत्या अशा समस्या वाढतांना दिसतात. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना तर मन हेलावून टाकतात. म्हणूनच सावित्रीबाईंनी स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी व स्त्रियांच्या निर्भयतेसाठी केलेल्या कार्याला पुन्हा समाजात रुजविण्याची मोठी गरज जाणवते. जोपर्यंत या सामाजिक समस्यांविषयी समाजातील त्या-त्या क्षेत्रातील घटक पुढाकार घेणार नाही, तोपर्यंत समाजाला या समस्या भेडसावत राहणार. म्हणूनच सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्या माध्यमातून समाजात वैचारिक प्रबोधनाची मोठी गरज आहे. महिला मुक्तीसाठी तळागाळात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रेरणा व प्रसार - प्रचार करून समाजात जागृती होणे गरजेचे आहे.

डॉ. निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
शिरजगाव कसबा, जि.अमरावती
९३७११४५१९५
1 Comments

BHARAT MATA KI JAI NARI SIKSHA SAB SE UPAR

  • Jan 3 2022 8:08:02:773AM

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार