राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी योग्य दृष्टिकोनाची अमलबजावणी आवश्यक : ना. नितीन गडकरी
राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी योग्य दृष्टिकोनाची
अमलबजावणी आवश्यक : ना. नितीन गडकरी
भारतीय शिक्षण मंडळाच्या ‘सार्थक’ प्रदर्शनीचे उद्घाटन
राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी सर्व क्षेत्रात योग्य दृष्टिकोन स्वीकारून त्यानुसार त्याची अमलबजावणी करणे आवश्यक आहे. हा दृष्टिकोन अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि साध्य प्राप्त करणारा असावा, यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. पण भविष्यातील भारत कसा असावा याचा विचार करायचा असेल तर किमान 50 वर्षानंतरचा देश कसा असेल याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय शिक्षण मंडळाच्या भोपाळ येथील सार्थक या प्रदर्शनीचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद जोशी, संघटनमंत्री मुकुल कानिटकर, प्रो. डी.पी. सिंह, डॉ. अनिल सहस्रबुध्दे, डॉ. सुनीलकुमार उपस्थित होते. याप्रसंगी ना. गडकरी म्हणाले- भारतीय शिक्षण मंडळाने सार्थकचे आयोजन करून भविष्याचा विचार केला आहे. शिक्षण क्षेत्रात योग्य दृष्टिकोनाससह परिपूर्णतेकडे जाण्याचा आपला दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहे. राजकारणात 5 वर्षाचा विचार केला जातो, तर सामाजिक आार्थिक परिवर्तन क्षेत्रात काम करणारे 100 वर्षाचा विचार करून आपले कार्य करीत असतात. त्यांचा हा विचार महत्त्वपूर्ण आहे. आपणही देशाच्या भविष्याबाबतचा विचार करायचा असेल तर 50 वर्षानंतरचा देश कसा असेल असा दृष्टिकोन ठेवून विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.
भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर काय करावे लागेल याचा विचार योग्य दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सकारात्मकता, आत्मविश्वास आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हे शक्य आहे. सर्व क्षेत्रात 111 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा आम्हाला निर्माण करायच्या आहेत. येत्या 3 वर्षात मी महामार्गाच्या क्षेत्रात आपल्या पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपियन यांच्या पायाभूत सुविधांबरोबर नेण्याचे काम करेन. आमच्याकडे प्रतिभा, शिक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान याची कमी नाही. समाजाच्या सर्व क्षेत्रात परिवर्तन आणायचे असेल तर आमची आवश्यकता काय, हे आधी समजून घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
शिक्षणाचे उद्दिष्ट पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत रोजगार निर्माण करणे हे आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- प्रत्येकाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढले नाही तर देश आत्मनिर्भर कसा बनेल. कृषी, ग्रामीण, आदिवासी, मागास भागाचा विकास हाच आत्मनिर्भर भारताकडे जाणारा मार्ग आहे. देशाच्या विकासासोबत जे शिक्षण आपण देतो, जे संशोधन करतो, जे तंत्रज्ञान विकसित करतो, त्याचा संबंध आत्मनिर्भर भारत संकल्पना साकार करण्याशी आहे. सुखी, संपन्न, शक्तिशाली आणि सर्वाना अन्न, वस्त्र, निवारा देणारा भारत म्हणजे आत्मनिर्भर ही संकल्पना असल्याचे ते म्हणाले.