महाराष्ट्र भूमी म्हणजे नररत्नांची खाण. गोदावरीच्या पवित्रतेनी, सह्याद्रीच्या कड्यांनी आणि अनेक नररत्नांच्या पदचिन्हाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी. मराठी अस्मिता, शौर्याची व असीम तेजाची पताका बनवून देशभरात गौरविल्या गेलेली हीच ती महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्राची कीर्ती दिगंतरी उमटविण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो शिवछत्रपतींचा. त्याकाळी महाराष्ट्र प्रांत ३५० वर्षे परकियांच्या गुलामीत होता. परकीय गुलामगिरीचा काळाकुट्ट अंधार पसरलेला होता, अज्ञानाने रयत दुःखी होती, शेतकरी त्रस्त होता, स्त्रिया - मुले
असुरक्षिततेच्या सावटाखाली उभे होते. प्राचीन परंपरा, जाचक प्रथा, तत्कालीन जुलमी शासनकर्त्यांचा अमाप कर अशा अनेक गोष्टींनी सामान्य प्रजा हैराण झाली होती. हे प्रदीर्घ दृष्टचक्र संपता संपत नव्हते. पण असं म्हणतात ना, "काळरात्रीनंतर उषःकाल होतो" तसंच झालं. अंधाऱ्या सावटातून एक स्वातंत्र्यरुपी सूर्य उगवला. पराक्रमाची समशेर झळकू लागली आणि स्वातंत्र्याचे तेज आसमंती पसरू लागले. आई भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या पोटी शुर पुत्र जन्मला. तेजोमयी पराक्रमाचा आरंभ झाला. हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा वाली, प्रजाहितदक्ष राजा, स्फूर्तीचा जिवंत झरा, अतुलनीय शौर्याची गाथा निर्माण करणाऱ्या शिवबाचा जन्म झाला.
तो दिन महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिन होता. तो दिवस होता १९ फेब्रुवारी १६३०. शिवजन्माने शिवनेरी किल्लाही धन्य झाला. ढोल-ताशे वाजू लागले, पोवाडे गायल्या जाऊ लागले आणि या सुवर्णक्षणी पूर्ण आसमंत दणाणून गेले. स्वराज्य स्थापन करावे ही श्रींची इच्छा समजून रामायण-महाभारताच्या कथांनी जिजाऊंच्या संस्कारात वाढलेल्या शिवबांनी रयतेचे राज्य यावे म्हणून कसोशीने प्रयत्न केले. माॅं साहेबांच्या मार्गदर्शनात मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि सुरुवात झाली ती लोककल्याणकारी राज्य निर्मितीला. प्रजेची लेकराप्रमाणे काळजी घेणारे शिवाजी महाराज रयतेची सावली बनले. "राजा व्हावा ऐसा, शिवछत्रपती जैसा" असे प्रत्येकाच्या ओठातून निघावे असा आपलेपणा त्यांनी प्रजेत निर्माण केला. म्हणूनच आजही लोकशाहीत त्यांचे व्यक्तिमत्त्व संस्मरणीय आणि स्फूर्तिदायी ठरते. हे राज्य जनतेचे आहे हा विश्वास त्यांनी रयतेत पेरला. मानवता, औदार्य, लोककल्याणकारी राजा या उपमा त्यांना सार्थ ठरल्या. लौकीकाप्रमाणे त्यांनी मावळ प्रांतातील मावळ्यांना संघटित करून त्यांच्यात स्वराज्याची उर्मी भरून स्वराज्य निर्मिले.
"उत्तम प्रशासक, कुशल राज्यकर्ता तोच असतो, जो रयतेला सुखी करतो." असे कौटिल्य चाणक्य नीतित म्हणतो. कौटिल्याच्या चाणक्य नीतिप्रमाणे शिवाजी महाराज उत्तम प्रशासक होते. आग्र्यातील नजरकैद, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाचा वेढा असे अनेक बिकट प्रसंग शिवाजी महाराजांपुढे आले, पण त्यांनी प्रत्येक वेळी न घाबरता स्वतः प्रसंगावधान राखून त्या परिस्थितीला सामोरे गेले. राज्यविस्तार करतांना अनेक लढाया, मोहिमा त्यांना आखाव्या लागल्या. तेव्हा प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, पिकांच्या जमिनीवर युद्ध होणार नाही, सैन्य - घोडदळ पिकातून जाणार नाही या बारीक-सारीक गोष्टी मध्ये रयतेच्या राजाची भूमिका त्यांनी पार पाडली. यावरून त्यांची प्रजेविषयीची तळमळ व स्वराज्याची तळमळ दिसून येते.
मोहिमेवर असतांना कुण्या सैनिकाच्या हातातून स्त्रियांचा अपमान होणार नाही, वतनदार जहागिरी असणाऱ्या लोकांनी सुद्धा कोणावर अन्याय करू नये अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी घालून दिली होती. स्त्रियांचा सन्मान करणारा, शेतकऱ्यांची काळजी घेणारा, जाचक करांवर निर्बंध घालणारा, गडावर कोठारे भरून ठेवून दुष्काळ काळात अन्नधान्याचे वाटप करणार प्रजाहितदक्ष राजा काही आगळा-वेगळाच होता. म्हणूनच रयतही शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून टाकत होती.
जिवा महाला, मदारी मेहतर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे अशा जिवापेक्षाही जास्त मोलाच्या अनेक मोहरा स्वराज्य कार्यात त्यांच्या खर्ची पडल्या. पण त्यांच्यामागे शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुटुंबाची हेळसांड होऊ दिली नाही. यातच शिवाजी महाराजांच्या ठायी असलेला कनवाळूपणा दिसून येतो. शिवरायांनी शुन्यातून राज्य निर्माण केले, अखंड मोहिमा केल्या, गड - किल्ले जिंकले, बराच मोठा प्रदेश स्वराज्यास जोडला, नवे आरमार उभे केले, इंग्रजांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी जलदुर्ग बांधले, लढाया केल्या, पण खर्चाची वसुली शिवाजीमहाराजांनी कर लादून रयतेकडून कधीच केली नाही. उलट दुष्काळ काळात धान्याची कोठारे जनतेला खुली करून दिली. म्हणूनच स्वराज्य निर्मितीच्या काळात जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा एकमेवाद्वितीय राजा म्हणजे शिवाजी महाराज होय. शेतसारा निश्चित करणे, वतनदारांना आळा घालणे, शेत जमिनीचे मोजमाप करणे, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, रोजगाराची सोय करून देणे अशी इतिहासाने कायम स्मरणात ठेवावी अशी स्वराज्यनीती शिवाजी महाराजांनी रुजविली. त्यांनी त्यांच्या कार्याने एक सुवर्णमयी इतिहास लिहिला. म्हणूनच रणजित देसाई म्हणतात, "इतिहास वाचीत असतां त्यात दिसणारे शिवाजीचे रूप पाहून थक्क व्हायला होते. इतका अष्टपैलू, अष्टावधानी संपूर्ण पुरूष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परमधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण." खरंतर इतिहासाच्या पानोपानी छत्रपती शिवाजींच्या रुपाने आपल्याला भेटत जातो तो एक जाणता राजा, आपल्या शौर्याने, पराक्रमाने रयतेसाठी "रयतेचे राज्य निर्माण करणारा रयतेचा राजा." शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात जनतेला दिलेले हक्क व आदर पाहता लोकशाहीची बीजे शिवकालीन राज्यव्यवस्थेत आपल्याला दिसून येते. जनतेच्या सुखासाठी अविरत झटत असतांना रयतेचा वाली, जाणता राजा छत्रपती शिवाजी राजे यांच्यावर ३ एप्रिल १६८० ला मृत्युने झडप घातली आणि एका युगाचा अंत झाला. असं म्हणतात, काही व्यक्ती संपत नाही, सरत नाही तर स्फूर्ती बनून, अस्मिता बनून मनामनात रुजून जातात.
मराठी अस्मिता, मराठी बाणा पेरणारा हा जाणता राजा आजही प्रत्येकाच्या मनात स्फुर्तीचा जिवंत झरा म्हणून कायम कोरलेला आहे. अशा या इतिहासाच्या पानावरती अतुल्य शौर्यगाथा लिहिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझे विनम्र अभिवादन !