जळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना; वडिलांनी मुलीची गोळ्या झाडून केली हत्या तर जावई गोळीबारात तीन गंभीर जखमी

रिटायर्ड सीआरपीएफ अधिकारी वडिलांनी प्रेमविवाह केलेल्या मुली व जावयावर गोळ्या झाडल्या.

Sudarshan MH
  • Apr 27 2025 11:39PM
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयोजित हळदी समारंभात रिटायर्ड सीआरपीएफ अधिकारी वडिलांनी प्रेमविवाह केलेल्या मुली व जावयावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात मुलगी तृप्ती अविनाश वाघ (वय २५, रा. मुंबई, डहानुकर कॉलनी, कोथरुड, पुणे) हिचा जागीच मृत्यू झाला, तर जावई अविनाश ईश्वर वाघ (वय - २६ वर्ष) गंभीर जखमी झाला आहे.
 
गोळीबार करणाऱ्या वडिलांना घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पकडून चोपले, त्यामुळे ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मृत तृप्ती वाघ हिच्या सासूने, प्रियांका ईश्वर वाघ (वय ४५ वर्ष, रा. पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शनिवार, २६ एप्रिल रोजी रात्री सुमारे १०:१५ वाजता ही घटना घडली. पुण्याहून अविनाश वाघ आणि त्याचे कुटुंब हळदी समारंभासाठी चोपड्यात आले होते. ही माहिती मिळताच संशयित आरोपी, निवृत्त पोलिस अधिकारी किरण अर्जुन मंगले (वय ५५, रा. शिरपूर, जिल्हा धुळे) हे ही चोपड्यात पोहोचले.
 
त्यांनी आपल्या परवानाधारक बंदुकीतून मुलगी तृप्ती वाघ आणि जावई अविनाश वाघ यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाशच्या पाठीवर आणि हातावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला.
 
गोळीबारानंतर संतप्त नागरिकांनी किरण मंगले यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, तर जखमी अविनाश वाघ आणि किरण मंगले यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
या प्रकरणी संशयित आरोपी किरण अर्जुन मंगले (वय ५५) आणि त्याचा मुलगा निखिल किरण मंगले (वय २२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार