हुतात्मा दिन

थोर महापुरुषांच्या नावाने त्यांचा जन्मदिन किंवा स्मृतिदिन ओळखला जातो. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या बलिदानाची आठवण व त्यांच्या कार्याची सदैव प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा बलिदान दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

निलेशकुमार इंगोले ९३७११४५१९५
  • Jan 30 2021 10:16AM

आजच्या दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार राष्ट्रपिता गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या थोर राष्ट्रीय नेत्याला आदरांजली देण्यासाठी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधींचे विचार इतके प्रभावी आहेत की त्यांनी संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी भुरळ पाडली आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. त्यांचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वांची त्यांची जीवनप्रणाली होती.

त्यांनी प्रत्यक्ष स्वतः आचरण करूनच मग लोकांना उपदेश केल्याने त्यांच्या चुकांकडे बोट ठेवायला लोकांना फारशी संधीच मिळाली नाही. आपल्या जीवनकाळात जिथे ते गेले तिथल्या लोकांना अहिंसेच्या मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. त्यासाठी त्यांनी अहिंसा, असहकार या शस्त्रांचा वापर केला. इ.स.१९१५ पासून भारतातील त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी इ.स.१९१७ साली चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले. पुढे १९२० साली असहकार आंदोलन केले. १९३० साली सविनय कायदेभंग करून ब्रिटिश सरकारचे लक्ष भारतीयांच्या समस्यांकडे व भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाकडे वेधण्याचा प्रयत्न केला.

१९४२ मध्ये चले जाव आंदोलन करून ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले. या कामात त्यांना अनेक वेळा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला, पण त्यांनी कधीही त्याची पर्वा केली नाही. म्हणूनच देशाच्या कल्याणातच स्वतःचे हित जाणणाऱ्या या महान व्यक्तीला भारताचा राष्ट्रपिता म्हणून गौरविण्यात येते. गांधीजींविषयी सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले होते की, "गांधी नावाची हाडामासाची व्यक्ती अस्तित्वात होती यावर नवीन पिढीचा विश्वासच बसणार नाही, कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही." या वाक्यातुन त्यांच्या अमर्याद कार्याची प्रचिती येते.

गांधीजींनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीत ग्रामोद्योग, ग्रामस्वराज्य, आरोग्य, पर्यावरण, ग्रामस्वच्छता, सर्वधर्मसमभाव, इत्यादी विषयांवर मांडलेली मते आजच्या काळात मार्गदर्शक ठरतात. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य, अहिंसा, शरीरश्रम, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, सर्वधर्मसमभाव, आदींचे पालन केल्यास समाजातील वाईट भावना दूर होतील व देशाचा विकास होईल असे त्यांचे विचार आहेत. आपला ह्क्क् व न्याय मिळवण्यासाठी हिंसा करूनच तो मिळवता येतो याच्या ते विरुद्ध होते. ते सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते व अहिंसेच्या मार्गानेच आपल्याला न्याय मिळविता येते यासाठी ते आग्रही होते.

त्यांनी देशाला स्वतंत्र, समृद्ध, आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. या थोर महात्म्याचे कार्य देशासाठी अनमोल आहे. म्हणूनच राज्य सरकारने स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि तिन्ही सेना दलाचे प्रमुख राजघाटावर गांधीजींच्या समाधीजवळ या थोर महात्म्याला आजच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करतात. हुतात्मा दिनानिमित्त या थोर महात्म्याला विनम्र अभिवादन !  

1 Comments

Ayush jagannath dalvi

  • Jan 30 2022 8:06:32:400AM

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार