ढाका: बांगलादेश पोलिसांनी ढाका येथे हिंदू समूहाचे 'सम्मिलित सनातनी जोत'चे नेते आणि इस्कॉन ट्रस्टचे सचिव चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे हिंदू समाजातील लोकांनी या विरोधात निदर्शने काढली. हिंदू समाजातील लोकांनी चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेची मागणी केली. याच दरम्यान हिंदूवरही हल्ले करण्यात आले आहे. यामध्ये एक प्राध्यपक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्या अटकेविरोधात चितगाव आणि ढाका येथे आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, भारताकडून घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी बांगलादेशने द्यावी, असे म्हटले आहे. ते ‘सम्मिलीता सनातनी जोत’ या हिंदू संघटनेचे नेते आहेत. दास आणि १८ जणांविरोधात ३० ऑक्टोबर रोजी खटला दाखल करण्यात आला आहे.
भारताने या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि बांगलादेश सरकारला हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी देण्यास सांगितले आहे. दास यांच्या अटकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे, की या घटनेनंतर हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर बांगलादेशमधील अतिरेकी घटकांकडून हल्ले करण्यात आले आहेत. अल्पसंख्याकांची घरे आणि व्यावसायिक आस्थापनांची जाळपोळ आणि लूटमारीच्या अनेक घटना नोंदविल्या गेल्या आहेत. तसेच, बांगलादेशमधील मंदिरांत चोरी आणि देवतांच्या विटंबनाच्या घटनाही घडल्या आहेत. दुर्दैवाने, या घटनांतील दोषी मोकाट आहेत आणि वैधानिक मार्गाने शांततापूर्ण मागणी करणाऱ्या धार्मिक नेत्याविरुद्ध आरोप केले जात आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, चिन्मय कृष्ण दास यांनी बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेश गुप्तहेर विभागाने चिन्मय यांना ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. अटकेनंतर त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. एका बांगलादेशी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिन्मय दास हे ISKCON ट्रस्टचे प्रमुख होते, मात्र त्यांना अलीकडेच त्यांच्या पदावरून निष्कासित करण्यात आले होते. त्यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, २५ ऑक्टोबर रोजी चितगाव येथे आयोजित रॅलीमध्ये बांगलादेशच्या ध्वजाच्या वर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकवण्यात आला होता. यामुळे बांगलादेशाच्या धव्जाचा अपमान झाला आणि त्यानंतर देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय दास यांना अटक करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. खटल्यावर सुनावणीदरम्यान चितगावचे महादंडाधिकारी काझी शारिफुल इस्लाम यांनी त्यांना जामीन नाकारला. चितगावबाहेर त्यांना अटक करण्यात आली. कायद्यानुसार, २४ तास त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले.शेख हसीना सरकार कोसळल्यापासून ५० जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्याकांवर दोनशेहून अधिक हल्ले झाले आहेत.