मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका*

छत्रपती संभाजी नगर,:- बाळासाहेब होते तेव्हा दिल्लीतले नेते मातोश्रीवर येत होते मात्र आज उलटं झालंय, दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय, बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आली, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. छत्रपती संभाजी नगर येथे महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

Sudarshan MH
  • Nov 14 2024 5:30PM
*बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय*
 
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका*
 
*महाविकास आघाडीच्या काळात भ्रष्टाचाराचा डोंगर*
 
*मराठवाड्यावरील दुष्काळाचा कलंक पुसणार*
 
छत्रपती संभाजी नगर,:- 
बाळासाहेब होते तेव्हा दिल्लीतले नेते मातोश्रीवर येत होते मात्र आज उलटं झालंय, दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय, बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आली, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. छत्रपती संभाजी नगर येथे महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार अहंकारी होते. महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणे हा कमीपणा नाही. राज्याला विकासासाठी निधी मिळवण्यासाठी आम्ही जातो पण ते मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा, यासाठी दिल्लीत जातात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी उबाठाला लगावला.  
 
महायुतीच्या योजनांवर बोटं मोडली आणि त्या योजना चोरून थापासुत्री आणली, अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्यावर केली. काँग्रेस आघाडी खोटं बोलणाऱ्यांचे दुकान असून त्याच्या गल्ल्यावर उबाठा बसले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला गिऱ्हाईक बनवण्याचा त्यांचा डाव आहे पण इथली जनता सुज्ञ आहे येत्या २० तारखेला महाआघाडीच्या दुकानाचे शटर कायमचे बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला.
 
अडीच वर्षात त्यांनी घरात बसून फेसबुकने लाईव्ह करुन सरकार चालवले. खंडणीच्या आरोपाखाली गृहमंत्री जेलमध्ये गेले. सगळे बडे प्रकल्प बंद केले. कामात स्पीडब्रेकर घालून जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटरग्रीड, मेट्रो असे अनेक प्रकल्प बंद होते. मंदिरे बंद होती तर भ्रष्टाचाराची दुकाने राजरोस सुरु होती. आम्ही ती सत्ता उलथवून टाकली आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले आणि मोदींच्या आशिर्वादाचे सरकार आणले, असे ते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 
 
राज्याला मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले पण इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. मराठवाड्यावर लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा निर्धार आपल्या सरकारने केलाय. महाविकास आघाडीने बंद केलेला मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नदीजोड प्रकल्प आपण सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे इथल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. असे आवाहन त्यांनी केले. 
 
मागील सव्वा दोन वर्षात महायुतीने कामाचा डोंगर उभा केला तर महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगऱ होता. महायुती सरकारने महाराष्ट्राची गेलेली पत पुन्हा मिळवली. तिसऱ्या क्रमांकावर गेलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणला, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ इथ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले ही महायुतीच्या विजयाची नांदी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. जे ट्रम्प यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलतात. पुतीन यांच्याशी मित्राप्रमाणे बोलतात, मोदीजी जगभरात जिथे जातात तिथे विकासाचे बोलतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. आमचे सरकारही मोदीजी तुमच्या पावलांवर चालत असून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहोत, असे ते म्हणाले. प्रभू श्रीरामानंतर, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याचे रक्षण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.लोकसभेत विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरले तरीही मोदीजींना पराभूत करु शकले नाहीत. ६० वर्ष काँग्रेसने देशाचे वाटोळे केले पण १० वर्षात प्रधानमंत्री मोदी यांनी या देशाला पुढे नेले. विदेशात जाऊन भारताचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार