लातूर: जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा अमित देशमुख यांनी केले.
निलंगा तालुक्यातील गौर येथे मांजरा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान पाहणी वेळी ते बोलत होते.या प्रसंगी अशोक पाटील निलंगेकर, अभय साळुंके, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय कृषि अधिकारी राजेंद्र कदम,जिल्हा कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने,तहसीलदार गणेश जाधव उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टी व मांजरा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने त्यांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश संबंधितांना दिले. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास शासन कटीबध्द आहे,असे स्पष्ट केले.
पीक विम्याचे अर्ज स्विकरावेत
पीक विमा संदर्भातील ऑनलाईन / ऑफ लाईन पध्दतीने पीक विमा संदर्भात संबंधीतांनी गाव पातळीवर अर्ज स्वीकारावे अशा सुचना यावेळी त्यांनी प्रशासनास दिल्या.
या पूर परिस्थीती पाहणी कार्यक्रमास पालकमंत्री देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा व ढोबळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पीक नुकसानीची पाहणी करुन गावातील शेतकरी ग्रामस्थांशी अस्थेवाईकपणे चर्चा केली. त्यांच्या सूचना व मागण्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी संबंधीत विभागाचे अधिकारी, कृषि सहायक, ग्रामसेवक, तलाठी,ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
Video link:
https://www.youtube.com/watch?v=9-P94M2ZVxo