आपल्या देशाला स्वतंत्र होऊन आणि लोकशाही स्वीकारून 74 वर्षे झाली आहेत, तरी देशाची अवस्था दयनीय आणि दुर्बल झाली आहे. देशात अनाचार वाढला असून भ्रष्टाचाराच्या नावाने आपल्या देशाला ओळखले जाते. प्रत्येक नागरिकाला कुठल्या ना कुठल्या त्रासातून जावे लागतेच. देशात असे कोणतेच क्षेत्र शिल्लक राहिले नाही, जिथे भ्रष्टाचार नाही. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अँगस मॅडीसन यांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा जी.डी.पी. (सकल घरेलु उत्पादन) जगात सर्वोच्च स्थानावर होता. मुघल आणि इंग्रज येण्यापूर्वी आपला देश विकसित देश होता; मात्र आता लोकशाही विफल होताना दिसत आहे. जर आपल्याला आदर्श व्यवस्था हवी असेल, तर लोकांनी जागरूक होऊन आपले अधिकार जाणून संविधानिक मार्गाने संघर्ष करावा लागेल आणि भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था स्थापित करावी लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरोग्य साहाय्य समिती आणि ‘सुराज्य अभियान’ आयोजित ‘चला स्वराज्याकडून सुराज्याकडे...’ या विशेष संवादात ते बोलत होते.
स्वराज्यानंतर सुराज्य न येण्याचे कारण स्पष्ट करतांना हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याकडे गुरुकुल शिक्षणपद्धतीमध्ये व्यावहारिक शिक्षणासह राष्ट्रवाद, कर्तव्यपरायणता, परोपरकार या नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते; मात्र देश स्वतंत्र होऊन 74 वर्ष झाली, तरीही आपली स्वत:ची शिक्षणव्यवस्था नाही. सध्याच्या ‘मेकॉले’च्या शिक्षणप्रणालीमुळे नागरिक केवळ सुशिक्षित होत आहेत पण सुसंस्कारी होत नाहीत. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), डॉक्टर, अधिवक्ता आदी क्षेत्रात मोठे झालेले लोक सामान्य लोकांना लुटून भ्रष्टाचार करताना दिसतात. भारतातील कायद्याचे लोकांना मुळीच भय वाटत नाही. पोलीस ठाण्यात, तसेच न्यायालयात अनेक खेटा घातल्या तरी न्याय मिळत नाही. आज युवा पिढीसमोर भ्रष्ट पुढारी आणि अनैतिक सिनेकलाकारांचा आदर्श ठेवला जात आहे. ही सर्व स्थिती पालटून आपल्याला सुराज्य स्थापन करण्यासाठी संघटीत होणे आवश्यक आहे.’
सनातन प्रभात नियतकालिकाच्या प्रतिनिधी सौ. गौरी कुलकर्णी म्हणाल्या, ‘प्रसारमाध्यमांची ताकद खूप मोठी आहे. प्रसारमाध्यमांनी राष्ट्रहित आणि समाजहिताची भूमिका निश्चित करून फक्त समस्या न मांडता त्याच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय सांगणे आवश्यक आहे, असे झाल्यास सुराज्य स्थापनेच्या मोहिमेत पत्रकारिता क्षेत्राचेही योगदान होईल. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रनिष्ठ पत्रकारितेचा आदर्श सर्वच पत्रकारांनी घेतला पाहिजे.’