तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे

जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ प्रतीबंध कायदा कोटपा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी व स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केले.

S.n.ranjankar
  • Jul 28 2021 7:52PM

लातूर, दि.28- 
      पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष लातूर व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा कोटपा 2003 व त्याची अंमलबजावणी या विषयावर आयोजित चर्चासत्रात पोलीस अधीक्षक पिंगळे मार्गदर्शन करत होते.

      राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत चालणाऱ्या जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा सार्वजनिक  आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून कोटपा कायद्याची प्रभावी अमलबजावणी करून सार्वजनिक हिताचे रक्षण करावे असे पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी सूचित केले. तसेच तंबाखू विक्रेत्यानी शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्री करू नये, तसेच धोक्याची सूचना नसलेले तंबाखू जन्य पदार्थ विकू नयेत, 18 वर्ष खालील मुलांना तंबाखू जन्य पदार्थ विक्री करू नयेत अथवा त्याचे कडून विक्री करून घेऊ नयेत तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखू जन्य पदार्थांचा वापर करू नये. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश या प्रसंगी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले.  लातूर शहर तंबाखू धूरमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासन कोटपा 2003 कायद्याची प्रभावी अमलबजावणी करेल असे त्यांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक   जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा सल्लागार डॉ. माधुरी उटिकर यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची उद्दिष्टे व कार्य या बद्दल माहिती सांगितली. कोटपा 2003 अंतर्गत जिल्ह्यातील विविध उपक्रम व कार्यवाही संदर्भात माहिती त्यांनी सांगितली. 
      मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद चे विभागीय अधिकारी श्री अभिजीत संघई यांनी या प्रसंगी कोटपा कायद्यातील विविध कलम व अमलबजावणी या बद्दल विस्तृत माहिती दिली. अमलबजावणी अधिकारी यांची नेमणूक व कार्यवाही पूर्तते संदर्भात माहिती तसेच धूरमुक्त लातूर शहर अभियान राबविण्यासाठी पोलिस प्रशासन चे  अपेक्षित असलेले सहकार्य व त्याचे निकष या बद्दल माहिती सांगितली. 
 या कार्यशाळेस संपूर्ण जिल्ह्यातील 40 पेक्षा जास्त पोलिस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी श्री भातलवंडे पोलिस निरीक्षक व श्री जितेंद्र कदम तसेच डॉ लक्ष्मण देशमुख जिल्हा शल्यचिकिस्तक व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरीदास यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे शेवटी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे श्री बेंबरे यांनी तंबाखू विरोधी शपथ दिली व कु. शेडोळे यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमीसाठी संपर्क-

श्रीकांत रांजणकर
जिल्हा प्रतिनिधी
9834706034

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार