गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका ते नांदेड नाका रिंगरोड अत्यंत खराब अवस्था झालीय. रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पावसाचे पाणी खड्यात साचून अंदाज येत नाही यामुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागात आहे याच्या निषेधार्थ लातूर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वारंवार सूचना देऊनही रस्ता दुरुस्ती होत नसल्याने भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनं करण्यात आले. आंदोलना दरम्यान लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रतिमेला खड्यात साचलेल्या पाण्याचा अभिषेक करण्यात आलाय. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा पोलिसांनी पळवण्याचा प्रयत्न ही करण्यात आला. मात्र भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली. लवकर रस्ता दुरुस्त नाही झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपाच्या वतीने देण्यात आलाय.