छत्रपती संभाजीनगर: श्री क्षेत्र वेरूळ येथे परम पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व त्यांच्या उत्तराधिकारी परम पूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या पावन प्रेरणेने, वार्षिक ॐ जगद्गुरु जनशांती धर्म सोहळ्याची अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.
अक्षयतृतीया निमित्त २८ एप्रिल ते ५ मे या कालावधीत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो भक्तगण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने सहभागी झाले आहेत.
प.पू. बाबाजींनी (जनार्दन स्वामी महाराज) सुरू केलेली ही परंपरा, स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही अखंड श्रद्धेने आणि निष्ठेने पुढे नेली जात आहे.
या पावन सोहळ्यात विविध आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जपअनुष्ठान, अखंड नंदादीप प्रज्वलन, वेदविधीने संपन्न होणारा यज्ञयाग, तसेच महिला भक्तांसाठी विशेष जप कार्यक्रम यांचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमांमधून भक्तांना आत्मशुद्धी व आध्यात्मिक उन्नतीचा अनुपम अनुभव लाभत आहे.
सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी संपूर्ण वेरूळ परिसर पवित्रतेने न्हाल्यासारखा भासत होता. देशभरातील थोर संत-महंत, आध्यात्मिक गुरू व साधुसंतांचा या धर्ममेळाव्यास मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीने सोहळ्याची दिव्यता आणखीनच वृद्धिंगत झाली आहे.
स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेमळ आशीर्वादाने आणि सखोल आध्यात्मिक दृष्टीने भरलेले प्रवचन भाविकांच्या अंत:करणावर गोड ठसा उमटवत आहे. "धर्म, शांती व सद्गुण संवर्धनासाठी अशा सोहळ्यांचे अनमोल स्थान आहे," असे स्वामीजींनी आपल्या प्रवचनात नमूद केले.
या माध्यमातून श्री क्षेत्र वेरूळ हे आध्यात्मिक चेतनेचे आणि जनशांतीच्या विचारांचे प्रमुख केंद्र बनत आहे. भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेऊन आपल्या जीवनात शांती, समाधान आणि साधनेची गोडी निर्माण करावी, असे आवाहन स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी केले आहे.