पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात, की नाही? हे पाहण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनाला सादर केला आहे. या रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
धर्मादाय सहआयुक्त, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे अधिकारी, जे.जे. चे अधीक्षक, विधी व न्याय विभागाचे उपसचिव/ अवर सचिव हे चौकशी समितीत होते. काही दिवसांपूर्वीच या समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल शासनास सादर केला होता. अहवालात संबंधितांचे जबाबही आहेत. या अहवालानंतर शासन काय कारवाई करते? हे बघणे महत्वाचे राहील.