दिवसाढवळ्या एकाचवेळी तीन बिबट्यांचे दर्शन तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी
तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी
दिवसाढवळ्या एकाचवेळी तीन बिबट्यांचे दर्शन
तात्काळ पिंजरे लावण्याची मागणी
तळोदा प्रतिनिधि..राहुल शिवदे...
तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात दिवसाढवळ्या बिबटयांचा वावर वाढल्याने शेतकरी, वाहनधारक, मजूर भयभीत झाले असून संबंधित विभाग काही अप्रिय घटना घडण्याची वाट बघत आहे का असा प्रश्न निर्माण होत असून संबंधित विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे .
रांझणी गोपाळपूर रस्त्यावर सागर गोसावी व सागर सोजळ हे दोन युवक पावसाने उघडीप दिल्याने शेतीशिवारात पीक पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यापासून काही अंतरावरच तीन बिबट सोबत चालत असल्याचे दिसून आल्याने त्यांची एकच भंबेरी उडाली.त्यांनी तेथून काढता पाय घेतला व गावात आपल्या मित्रांना भ्रमणध्वनीद्वारे ही माहिती कळवली. पण तोपर्यंत बिबट तिथून पसार झाले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वीच रांझणी येथील ग्रामपंचायत सदस्य धनराज कदम व विजय ठाकरे हे आपल्या मोटरसायकलने तळोदाहुन रांझणीला येत असताना रांझणी फाट्याजवळ रस्त्यालगतच दोन बिबट्यांचे त्यांना दर्शन झाले होते. त्यामुळे दिवसाढवळ्या बिबट दिसू लागल्याने भीती वाढली असून संबंधित विभागाने पिंजरे लावून बिबटयांना जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
परिसरात पावसाने काहीशी उघडीप दिली असल्याने निंदणी, फवारणी, खते देणे या कामांना वेग येणार असला तरी बिबट्यांचा खुलेआम वावर वाढल्याने मजूरवर्ग धास्तावला असून केळी, पपई ,ऊस,कापूस यासारख्या पिकांच्या आजूबाजू कामे करण्यास त्यांच्याकडून नकार देण्यात येत असल्याचेही बोलले जात असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान दोन, तीन बिबट सोबतच फिरत असल्याने त्यांच्यामध्ये सावजावरून जोरदार झुंज झाल्यास ते मृत्युमुखी पडू शकतात असे बोलले जात असून गेल्यावर्षी रांझणी गावाजवळ दोन बिबटाच्या झुंजीत एक बिबट्या मृत्युमुखी पडला होता .याबाबतही संबंधित विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. तसेच ह्या वनपरिक्षेत्रात बिबट्यांचे संख्या किती हाही एक प्रश्न असून दहापेक्षा अधिक बिबट या क्षेत्रात असू शकतात असेही जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
भरपाई मागावी कुणाकडे हाही प्रश्न
परिसरात शेळ्यासह इतर प्राणी मिळून येत नसल्याने त्यांच्या शोध घेऊनही पशुमालकांना ते मिळून येत नसल्याने ते बिबट्याचे बळी ठरले असे पशुमालकांच्या लक्षात येत असले तरी त्यांना शेत शिवारात शोधुनही आपले पशु मिळून येत नसल्याने त्यांच्याकडे बिबट्याने मृत्यूमुखी पाडल्याच्या कुठलाही ठोस पुरावा नसल्याने ते नुकसान भरपाई पासून वंचित राहत असून बहुतांंश जणांना याचा फटका बसला आहे.