लॉकडाऊनमुळे अडकलेल्या देवगड तालुक्यातील चिरेखाणीवरील कामगारांपैकी 373 कामगारांना 18 एस. टी. बसमधून गुरुवारी ओरोस रेल्वेस्टेशन येथे सोडण्यात आले. या कामगारांना रेल्वेने कर्नाटक राज्यातील विजापूर-गुलबर्गा येथे सोडण्यात येणार आहे. या 18 गाडय़ांना तहसीलदार मारुती कांबळे यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडय़ा रवाना केल्या. शुक्रवारी 855 कामगार जाणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली
गुरुवारी विजापूरी कामगारांना पाठविण्यासाठी 18 बसेस देवगड आगारात उभ्या करण्यात आल्या होता. 373 कामगारांमुळे देवगड बसस्थानक गर्दीने तुटुंब भरले होते. सोशल डिस्टन्सीचे तीनतेरा वाजले होते. सर्व कामगारांना चिरेखाण व्यावसायिकांनी मास्क, सॅनिटायझर, पिण्याचे पाणी, बिस्कीट पुडे असे साहित्य प्रवासासाठी दिले. या सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबियांची बसस्थानकात आरोग्य विभागाच्यामार्फत तपासणी करून त्यांना बसमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार प्रीया परब, आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण, स्थानक प्रमुख श्री. गोरे, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम आदी उपस्थित होते.