पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडं जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्याचं क्रॉंक्रिटीकरण करावं, यासाठी सातत्यानं पाठपुरावा होऊनही या रस्त्याचं काम सुरु झालं नाही. याविरोधात काल दि. ९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानचे ट्रस्ट मंडळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या कित्येक महिन्यापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. पण दीड किलोमीटरच्या रस्त्याचं काम होत नाही. बनेश्वर हे आमच्या श्रद्धेचा विषय असून या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मात्र, तसं घडतांना दिसत नाही. या रस्त्याचं काम व्हावं यासाठी शासनाकडं देखील पाठपुरावा केला आहे. मात्र, रस्त्याचं काम झालं नाही. भिजत घोंगडं राहिलेलं काम पूर्ण व्हावं म्हणून बेमुदत उपोषणाच्या आंदोलनाचं अस्त्र उगारावं लागल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.