अवैध दारूच्या वाहतूकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...
एकुण 19 लाख 81 हजार 752 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..!
नंदुरबार- महागड्या तीन ते चार कारमधून देशी-विदेशी दारूची अवैधरित्या चोरटी वाहतूक केली जात होती. नंदुरबार एलसीबीच्या पथकाने प्रकाशा येथील काथर्दे फाट्याजवळ सापळा रचून पळ काढणाऱ्या दोन कारमधून 19 लाख 81 हजार 752 रुपयांचा दारू साठ्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अक्कलकुवाकडे पसार झालेल्या दोन कारांचा पोलीस शोध घेत आहेत.
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतुन प्रकाशा मार्गे अक्कलकुवाकडे तीन ते चार चारचाकी वाहनात अवैध दारुची चोरटी वाहतुक होणार आहे, अशी खात्रीशिर माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास माहितीची खात्री करुन कारवाई करण्यास सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे शहादा पोलीस ठाणे हद्दीतील प्रकाशा गावातील काथर्दे फाट्यावर येऊन थांबले असता, शहादा गावाकडून प्रकाशा गावाकडे तीन ते चार या चारचाकी वाहने एका मागुन एक असे येतांना दिसले. सदर वाहनांना पोलीस पथकाने हात व टॉचं देऊन थांबविले असता त्यातील पुढील दोन चारचाकी वाहनातील अज्ञात चालकांनी त्याचे ताब्यातील वाहने हे जोरात चालवून पोलीसांचे समोरील असलेल्या बॅरिगेटला धडक देऊन जोरात अक्कलकुवाकडे पळ काढला, तसेच मागील दोन चारचाकी वाहनातील चालक यांनी देखील मागील दिशेने पळ काढत शहादाकडे जोरात वाहन चालवून निघुन गेले. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वेळेचा अपव्यय न करता शहादाकडे जाणा-या वाहनांचा पाठलाग करता त्यातील एक टोयोटा कंपनीची इनोव्हा कार हीस ब्राम्हणपुरी रस्त्या जवळ अडविले असता सदर वाहनावरील चालकास ताब्यात घेता त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव ललीतकुमार रामुभाई सुमन (वय 38 वर्षे, रा. उदवाडा, ता. पारदी जि. बलसाड, राज्य गुजरात) असे सांगितले. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाहनाचा पाठलाग करीत असतांना सदर वाहनचालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे ब्राम्हणपुरी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ सोडून पळ काढला होता. ताब्यातील दोनही वाहनांची तपासणी करता वाहनात देशी-विदेशी दारु मिळून आली असुन ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस विश्वासात घेऊन सदरचा माल कोणाकडून आणला, तसेच कोठे घेऊन जाणार बाबत विचारपूस करता त्याने सदरचा माल हा भरत यादव व डब्ल्यू (दोन्ही रा. वापी जि.बलसाड राज्य गुजरात) यांचा असल्याचे कळविले. तसेच पोलीसांचे ताब्यात असलेल्या हयुंडाई कंपनीचे 120 चारचाकी वाहनातील पळून गेलेल्या वाहन चालकाचे नाव कमलेश पटेल, रा.उदवाडा, ता. पारदी जि.बलसाड रा. गुजरात असे सांगितले. तसेच अक्कलकुवाकडे पळ काढून निघुन गेलेल्या चारचाकी वाहनांबाबत विचारता एक्सयूव्ही 500 वाहनात भरत यादव व डब्ल्यु हे असून दुसऱ्या पळुन गेलेल्या हयुंडाई कंपनीचे सेंन्टाफी चारचाकी वाहनात मोहसिन पठाण (रा. वलसाड राज्य गुजरात) असे असल्याचे त्याने सांगितले. सदर कारवाईत एकुण 19 लाख 81 हजार 752 रुपये किमतीचा देशी विदेशी दारु तसेच वाहन असा मुद्देमाल मिळून आला असून आरोपींविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 701/2024 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(2), 221, 281, 3(5), सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 80, 83, 108 सह मोटार वाहन कायदा कलम 187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि.मुकेश पवार, पोहेकॉ.राकेश वसावे, मुकेश तावडे, सजन वाघ, मनोज नाईक, रमेश साळुंखे, पोना.मोहन ढमढेरे, विकास कापूरे, पोकॉ.विजय ढिवरे, अभय राजपूत, दिपक न्हावी, यशोदीप ओगले अशांनी केली आहे.