अवैध व्यवसायासाठी वापरल्या
जाणार्या 34 वाहनांची नोंदणी रद्द
नंदुरबार- वाहनांचा वापर करुन अवैध व्यवसाय करणार्या वाहनांविरुध्द नंदुरबार जिल्हा पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत 34 वाहनांची नोंदणी 4 महिन्यासाठी निलंबीत करण्यात आली आहे.
आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक-2024 तसेच सण व उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच गुन्हेगारांवर वचक राहून निवडणूका भयमुक्त व प्रलोभणमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी अवैध दारुची निर्मिती, वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, शस्त्र, अंमली पदार्थांची लागवड, विमल गुटखा इत्यादींवर जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दि.15 ऑक्टोंबर 2024 पासून सुरु असलेल्या कारवाई दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करुन अवैध दारुची निर्मिती, वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, शस्त्र, अंमली पदार्थांची लागवड, विमल गुटखा इत्यादींची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करुन अवैध व्यावसाय करणारे वाहन चालक व वाहनांवर कायदेशीर कारवाई करुन वाहनांची नोंदणी निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात आले होते. त्याअनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार यांनी मोटार वाहन कायद्यान्वये अवैध दारु अथवा गुटखा वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांवर कारवाई करत 34 वाहनांची नोंदणी 4 महिन्यांसाठी निलंबीत करण्याबाबतचे आदेश दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी दिलेले आहेत. निलंबीत केलेले वाहन जवळचे पोलीस ठाणे किंवा उप प्रादेशीक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे जमा करण्याबाबत आदेश दिलेले आहे.