महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. निकाल अनपेक्षित लागले . अनेकांनी आपल्या विश्लेषण करताना संघ , स्वयंसेवक याना त्याचे श्रेय दिले. काहींनी तर संघाचे प्रचारक , अधिकारी यांची नावे छापून जणू काही हे सगळे तेच घडवून आणण्यासाठी दिवस रात्र झटत होते असे म्हंटले आहे.
संघ न समजल्याने , संघावरील अती भावनिक प्रेम करण्यामुळे आणि जाणून बुजून चुकीचा विमर्श प्रस्थापित करण्यासाठी अशा विविध कारणानं अशा बातम्या, फोटो प्रकाशित होतात आणि नकळत समाज , संघ स्वयंसेवक आणि संघ प्रेमी यांच्या मनात संघ विषयक एक संभ्रम निर्माण होतो.
तर ह्या मुळ चित्रा विषयी! ह्यात गणवेश घातलेला स्वयंसेवक पुन्हा आपल्या कार्यात वळलेला , त्या सोबत काही काव्य पंक्ती पण लिहल्या गेल्या आहेत.
खरे तर अशा समाजात घडणाऱ्या विविध हालचालीत स्वयंसेवक व्यक्तिगत भूमिकेतून उतरणे अपेक्षित आहे.ह्या बाबतीत संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी जंगल तोड सत्याग्रहात घेतलेला सहभाग हे खूप मोठे उदाहरण आहे. ( त्यावेळी स्वतःला सर संघचालक दायित्वातून स्वतःला मुक्त करून घेतले होते ) म्हणूनच जे अज्ञानी लोक संघाने स्वातंत्र्य लढ्यात काय केले ? असे विचारतात तेंव्हा संघटना म्हणून उत्तर काही नसते . संघाला ते अपेक्षित नाही. पण स्वयंसेवकांनी केलेले काम कुठेही नोंद झालेले नाही आणि त्याचे प्रमाणपत्र पण संघाने घेतलीं नाहीत.
राष्ट्रकार्यात भाग घेताना संघटनेचा अभिनिवेश गळून पडला पाहिजे आणि कर्तव्य भावनेतून आपली भूमिका त्या त्या वेळी पार पाडली पाहिजे हे पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचे सूत्र होते. म्हणूनच ज्यावेळी महाराष्ट्रात हे निवडणुकीचे वातावरण होते त्यावेळी सर्वत्र संघाचे आरंभिक वर्ग पण चालू होते.
व्यक्तिगत अनुभव म्हणाल तर अगदी निवडणुकीच्या अगोदर एक दिवस संघाच्या प्रांत मुख्यालयात प्रांत प्रचारकांची वाट बघत असताना ते एक बैठक करून आले होते. ती बैठक होती डिसेंबर मधील शाखा वाढ आणि शाखेतून शाखा ह्या विषयाची होती. व्यक्ती निर्माण कार्याचा फोकस कुठे ही ढळू न देता गेली १०० वर्षे हा यज्ञ चालू आहे हे येथे लक्षात ठेवावे लागेल.
मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेत यशस्वी कार्यक्रम झाल्यावर विश्व विभागाचे प्रचारक सौमित्र गोखले ह्यांच्या बद्दल पडद्यामागील सूत्रधार असे वर्णन आले होते . आता सुद्धा काही प्रचारकांची नावे भाजप यशाची जोडले जातात ह्यात संघाबद्दल, प्रचारक संकल्पने बद्दल असणारे अज्ञान कारणीभूत आहे.
असे काही छापून आल्याने त्यांच्यावर काहीं परिणाम होत नाहीं ते हुरळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .परंतु समाजाची धारणा वेगळी होवू शकते . म्हणून प्रचारक संकलप्ना समजावून घेतली पाहिजे आणि सामान्य स्वयंसेवकांनी , कार्यकर्त्यांनी ह्या बाबत सावध पण झाले पाहिजे.
प्रचारक मग तो कुठल्या स्तरावरचा असो , सध्या त्याच्या कडे कुठलेही , कुठल्याही संस्थेचे दायित्व असो संघरचनेत जो पर्यंत त्याला प्रचारक म्हणून संबोधले जाते आणि तो स्वतःचा परिचय तसा करून देत असतो तो पर्यंत काही बंधने त्याला अनिवार्य असतात. सामान्य मानवी जीवनाच्या पलीकडील ही मूल्ये असतात आणि ती टिकून राहिली म्हणून संघ १०० वर्षे वाटचाल करू शकला.
राजकारणात उघडपणें संघटन मंत्री म्हणून दायित्व असणारे अनेक संघ प्रचारक आहेतच. पण तात्कालिक परिस्थिती मध्ये जेंव्हा जेंव्हा हिंदू समाजाच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा तेंव्हा संघाला निवडणूक ह्या विषयात लक्ष घालावे लागते पण ते संघाचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवून.
व्यक्तिगत स्तरावर लोकेषणा आणि संस्था/ संघटना स्तरावर श्रेयवाद हा एक सामाजिक आजार आहे. ह्या पासून दूर राहिले तरच ध्येयवाद अबाधित राहतो अन्यथा लोकेशन आणि श्रेयवाद हेच ध्येय कधी बनते हे कळत नाही. सुदैवाने संघ संस्थापकाना ह्या सर्व गोष्टींचे त्यांच्या विलक्षण प्रतिभे मुळे हे सर्व ज्ञात होते. त्यातून जे संकेत आणि अलिखित नियम संघात तयार झाले त्यातूनच १०० वर्षे संघ यशस्वी वाटचाल करू शकला हे विसरून चालणार नाही.
संजय राऊत सारखे मूर्ख आणि अहंकार , लाचारी , स्वार्थ यात अखंड बुडालेल्या लोकांना हे सगळे समजण्याच्या बाहेरचे असल्याने संघाने विषारी प्रचार केला असे ते म्हणू शकतात. पण विष पचवून अमृत प्रसारित करणारे अमृतपुत्र संघाने डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेने निर्माण केले आहेत.
संघ व्यक्तिशः किंवा पक्षीय दृष्टिकोन ठेवून कुठल्याही समाज घटकाचा द्वेष करू इच्छित नाही. संघाला संपूर्ण हिंदू समाज आपलाच वाटतो. एकात्म हिंदू समाजासाठी संघ ही तात्कालिक व्यवस्था आहे आणि तिची आवश्यकता संपवावी ही अद्भुत कल्पना पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्यासारखे प्रतिभावंत फक्त करू शकतात.
१९७५ सालीआणीबाणी विरोधात, ८९/९१/९६ रामजन्मभूमी आंदोलन , २०१४ सालीभगवा दहशतवाद , भ्रष्ट व्यवस्था ह्या साठी स्वयंसेवकांनी निवडणुकीत काम केले ते स्वाभाविक देशाच्या हितासाठी आणि हिंदू हितासाठी. तेथे ही संघाने स्वयंसेवक आणि समाज ह्यांना व्यक्तिगत भूमिकेत काम करण्याची प्रेरणा देताना श्रेय घेण्याचे टाळले आहे आणि हे स्वयंसेवक , कार्यकर्ते ह्यांनी पण लक्षात ठेवले पाहिजे.
ज्या चित्राच्या निमित्ताने हे लिहावे वाटले त्यात सायकल दाखवली आहे आणि गणवेशातील स्वयंसेवक दाखवला
आहे. आधुनिक काळात स्वयंसेवक सायकल घेवून फिरतो हे सत्य नाही आणि ते दाखवण्याची आवश्यकता पण नाही. पण साधनांच्या पलीकडे संघ कार्य आहे हेही तितकेच खरे आहे. साधनांच्या वाचून अडले नाही आणि साधने संघाने आवश्यक तेंव्हा टाळली पण नाहीत.
दुसरे गणवेशा संदर्भात ! गणवेश हा समाजात स्वयंसेवकांची वेगळी ओळख म्हणून त्याने घालावा हे परम पूज्य डॉ.हेडगेवार यांना अपेक्षित नव्हते . तर आपल्या व्यवहारातून त्याची स्वयंसेवक म्हणून आपोआप ओळख व्हावी असे त्यांना वाटे. म्हणून काही ठराविक वेळीच स्वयंसेवक गणवेश घालतो आणि काढून ठेवतो.
प्रबोधन मंच वगैरे नावाने तात्कालिक कारणासाठी समाजात व्यवस्था निर्माण होतात त्यात स्वयंसेवक पुढाकार घेतात , सहभागी होतात आणि पुढे अलिप्त होतात. त्यासाठी संघ स्वयंसेवकांचे कुणी विशेष आभार व्यक्त करावे , अभिनंदन करावे ह्याची आवश्यकता वाटत नाही. हे म्हणजे डॉक्टर हेडगेवार म्हणायचे तसे स्वतःच्या आईच्या सेवेचे डांगोरे पिटण्यासारखे दांभिक आणि हास्यास्पद आहे.
हा गणवेश जितक्या सहजतेने तो ( स्वयंसेवक ) काढून ठेवतो तितक्या सहजतेने पुन्हा आपल्या मूळ कामाकडे वळतो. गुंतून राहत नाही. याबाबतीत राम / रावण युद्धातील वानर सेनेची भूमिका तीच भूमिका स्वयंसेवकांची असते.
राम रावण युद्धात वानर सेना ना अयोध्येतील होणाऱ्या राम राज्यातील लाभार्थी होती ना सोन्याच्या लंकेतील वैभवाची लोभी होती. सीता माई याना मुक्त करणे हा एकमेव विचार घेवून वानर सेना त्यात सहभागी होती म्हणून प्रभू रामचंद्र विजय प्राप्त करू शकले आणि राम राज्य प्रस्थापित करू शकले.
त्यामुळें स्वयंसेवक आणि संघ व्यक्तिगत लाभ आणि मोहाच्या पलीकडे असतो आणि चित्रा मध्ये दाखवलेले उदात्तीकरण पण संघाला अभिप्रेत नसतो.
ह्या निमित्ताने स्वयंसेवक , कार्यकर्ते , विश्लेषक आणि समाज असे सर्वच जण संघ अधिक समजून घेतील तर त्यासारखी चांगली गोष्ट नसेल. तूर्तास इतकेच.
रवींद्र मुळे,
अहिल्यानगर...
भ्रमणध्वनी : ९४२२२२१५७०.
२६/११/२४