*गडचिरोली जिल्ह्यात महायुतीचा विजय कायम, आरमोरीत काँग्रेसचा झंझावात*
गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये महायुतीने गडचिरोली आणि अहेरी मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व कायम राखले, तर आरमोरीत भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने विजय मिळवत जोरदार धक्का दिला. प्रारंभिक मतमोजणीत चुरशीचा सामना दिसून आला असला तरी शेवटी चित्र स्पष्ट होताच विजयाचे अंतर लक्षणीय ठरले.
*अहेरीत धर्मरावबाबा आत्राम यांचा हुकूमत कायम:*
अहेरी मतदारसंघात महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपला वर्चस्व कायम ठेवले. या ठिकाणी आत्राम यांचा सामना कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) आणि भाजपचे बंडखोर माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी होता. ही लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. परंतु, धर्मरावबाबा आत्राम यांनी १८ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवून अहेरीवर आपली पकड मजबूत ठेवली.
*गडचिरोलीत नव्या चेहऱ्याला संधी:*
गडचिरोली मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना नाकारून नव्या उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांना संधी दिली. काँग्रेसने मनोहर पोरेटी यांना मैदानात उतरवले होते. डॉ. नरोटे यांनी १४ हजारांहून अधिक मतांनी काँग्रेसच्या पोरेटी यांचा पराभव करून आपली ताकद सिद्ध केली आणि विजय मिळवला.
*आरमोरीत काँग्रेसचा विजय:*
आरमोरीत भाजपचे कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली होती. हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या गजबे यांना काँग्रेसचे नवोदित उमेदवार रामदास मसराम यांनी कडवे आव्हान दिले. मसराम यांनी ५,७८२ मतांनी विजय मिळवत भाजपच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला. या विजयामुळे आरमोरीत काँग्रेसने मोठे यश मिळवले.
या निवडणुकांमधून गडचिरोली जिल्ह्यात महायुतीने आपली ताकद कायम राखली असली तरी आरमोरीतील काँग्रेसचा विजय भविष्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण देऊ शकतो.