अद्ययावत तंत्रज्ञान व नवीन संशोधन हेच देशाचे भविष्य : ना. गडकरी
अद्ययावत तंत्रज्ञान व नवीन संशोधन
हेच देशाचे भविष्य : ना. गडकरी
‘स्टार्टअप सृजन व स्टार्टअप ग्रो’ कार्यक्रमाचे उद्घाटन
नवीन संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा कायापालट शक्य आहे. यामुळेच मागास असलेल्या या क्षेत्राची अर्थव्यवस्था मजबूत होईल. आगामी काळात नवीन संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य असेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘स्टार्टअप सृजन व स्टार्टअप ग्रो’ या कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन प्रसंगी ना. गडकरी बोलत होते. गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासामा व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- नवीन संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य व यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान असून ज्ञानाचे संपत्तीत कसे रूपांतर करता येईल याविषय विद्यार्थी आणि तरुणांना योग्य मार्गदर्शन प्राप्त होणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत म्हणजे अधिक रोजगार निर्मिती, निर्यातीत वाढ, कमी खर्चात दर्जेदार आणि अधिक उत्पादन, कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात उपलब्ध असलेल्या कच्च्या मालावर आधारित उद्योगनिर्मिती होय. यामुळेच आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल व जागतिक अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करेल, असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.
साखरेचे उत्पादक आवश्यकतेपेक्षा अधिक झाल्यामुळे सारखेचा देशाकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- आता सारखेपासून इथेनॉल निर्मिती व्हावी. इथेनॉल जैविक इंधन आहे. यामुळे इथेनॉलची अर्थव्यवस्था 2 लाख कोटींची होऊन शेतकर्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून इथेनॉल तयार करणे शक्य आहे. कार, बस, ट्रक, विमान यात इथेनॉलचा वापर यशस्वी ठरला आहे. नवीन संशोधनाने व अद्ययावत तंत्रज्ञानाने हे शक्य झाले आहे. मुंबई दिल्ली हायवे आम्ही बांधत आहोत. हा इलेक्ट्रिक मार्ग व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाने हे शक्य होणार आहे. कृषी आणि ग्रामीण भागात रतनज्योत, साल, करंज, मोह, टोली ही झाडे उपलब्ध आहेत. या झाडांपासून जैविक इंधन निर्मिती शक्य झाली आहे. विद्यार्थ्यांना आणि तरुण पिढीला नवीन संशोधनासाठी प्राधान्य आणि संधी उपलब्ध झाली पाहिजे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.